श्री प्रमोद वामन वर्तक
इंद्रधनुष्य
☆ महात्मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
भली मोठी पांढरी शुभ्र मरसिडीज, दूरदृष्टी महाराजांच्या बंड गार्डन रोडवरील राजवाड्या सदृश मठाच्या दारात थांबली. शोफरने धावत येवून दार उघडलं. आतून पांढऱ्या शुभ्र कपड्यातील एक खानदानी व्यक्ती अंगावरच्या श्रीमंतीच्या सगळ्या खुणा दाखवत उतरली. दूरदृष्टी महाराजांचे रोजचे प्रवचन, देशी विदेशी भक्तांच्या भरगच्च दरबारात चालू होते. ती व्यक्ती अदबीनं महाराजांच्या पाया पडली. रोजच्या प्रमाणे खिशातून पाचशेच्या नोटांची दोन कोरी बंडल्स काढली आणि महाराजांच्या पायाशी ठेवली. थोडावेळ खाली बसून प्रवचनाचा लाभ घेऊन, परत नमस्कार करून मठाच्या बाहेर पडून गाडीतून निघून गेली. एक महिनाभर हा प्रकार रोज सलग चालल्यावर, एक दिवस ती व्यक्ती बाहेर पडताच, महाराजांनी त्यांच्या सुखदेव नावाच्या खास शिष्याला खूण केली.
“महाराज त्यांचे नांव अनिरुद्ध महात्मे. पुण्यात ‘पुण्यात्मा’ नावाची त्यांची स्वतःची IT फर्म आहे. ” “अस्स, उद्या त्यांची आणि माझी भेट माझ्या खाजगी दालनात अरेंज करा.”
“नमस्कार महाराज, काय सेवा करू?” “नमस्कार महात्मे! आम्ही बघतोय, गेले महिनाभर तुम्ही आमच्या समोर रोज पाचशेच्या नोटांची कोरी बंडल्स……… ” “महाराज, गत आयुष्यात केलेल्या पापांच थोड तरी परिमार्जन व्हावे या एकाच हेतूने हे मी करतोय!” “नाही पण तुमच्या IT business मध्ये इतका पैसा ?” “महाराज, आपल्या पासून काय लपवणार आपल्याकडची बडी मंडळी आणि अनेक उद्योगपती यांची स्विस बँकेतली खाती मी मेन्टेन करतोय महाराज! तो पण माझा एक business च आहे, पण तो उघडपणे….. ” “समजलं महात्मे ! आमच्याकडे सुद्धा आमच्या फॉरीनच्या शिष्यानी दिलेली अनेक चलनातली अगणित रोख रक्कम…… ” “कळलं महाराज, आपण चिंता करू नका, फक्त आज्ञा द्या !” “महात्मे, उद्या सकाळी मला इथेच भेटा आणि ‘त्या’ सगळ्याची व्यवस्था स्विस बँकेत कशी लावता येईल ते पहा!” “जरूर महाराज ! उद्या सकाळी हा बंदा सेवेला हजर असेल !”
“सुखदेव, गेला आठवडाभर महात्मेची रोजची भेट बंद झाल्ये. ” “होय महाराज” “सुखदेव, त्यांचा काही निरोप ?” “काहीच नाही महाराज. ” “ठीक आहे. उद्या त्यांच्या IT फर्मला भेट द्या. ” “होय महाराज. “
“महाराज त्यांच्या फर्मला टाळं आहे. ” “काय ssss ?” “होय महाराज, अनिरुद्ध महात्मेनी फर्मची ती जागा तीन महिन्यासाठी भाड्याने घेतली होती, असं चौकशी करता कळलं. “
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈