सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गरुड भरारी…’ – लेखिका : नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

प्राचीन भारतात स्वयंवराची पद्धत होती. स्त्री स्वत:च्या अटींवर पारखून आपला जोडीदार निवडत असे.

सीता, द्रौपदी स्वयंवराची आपल्याला माहिती आहेच.

काळ बदलला. पुरुषप्रधान संस्कृती राज्य करू लागली. जोडीदाराला निवडायचा अधिकार आता पुरुषाकडे आला..

प्राणी पक्षी मात्र अजूनही बदलले नाहीत. निसर्गाने त्यांना जे शिकवले त्यानुसार ते आजही तसेच मार्गक्रमण करीत आहेत.

प्रजननाच्या काळात आजही बहुतांश प्राणी-पक्षी जगतात माद्या आपला नर साथीदार निवडतात.

गरुडांची ही अतिशय रोचक वरपरीक्षा..

गरुडांचा जेंव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेंव्हा अनेक नर गरूड मादीभोवती जमा होतात.

त्यातून बरा दिसणारा नर मादी निवडते आणि त्याला अंतिम निवडप्रक्रियेसाठी आवतण देते.

– – परीक्षा सुरू होते.

मादी स्वत:च्या चोचीत एक काडी धरते नि आकाशात उंच उंच उडत जाते.

नराने तिच्यामागून उडत जायचे… पण तिच्या पेक्षा वर जायचे नाही. खालच्या पातळीवर राहून सगळे लक्ष मादीवर केंद्रित करायचे.

मादी केंव्हाही तोंडातील काडी खाली टाकते. ती नराने पकडायची. ती तो पकडू शकला तर चाचणीच्या पुढच्या पातळीत त्याला प्रवेश.. नाहीतर तो नापास..

 

आता दुस-या पातळीत काडीचा आकार नि वजन वाढतं.. बाकी प्रक्रिया तीच..

 

पुढील प्रत्येक पातळीत काडी मोठी मोठी होत जाते.

 

आता काडीचं रुपांतर काठीत होत जातं.

शेवटच्या पायरीतील काठी साधारण गरुडपिल्लाच्या वजनाइतकी असते.

 

– – परीक्षेच्या सर्व पातळ्यात यशस्वीरीत्या उत्तीर्ण होणा-या नराच्या गळ्यात वरमाळा पडते. वधुवर आकाशात नृत्य करून आपला विवाहसोहळा पार पडतात..

 

सुरक्षित असा उंच वृक्ष शोधून त्यावर घरटं बनतं, दोघांच्याच हिमतीवर.. इतर कुणाच्याही आधाराशिवाय.. त्या सुंदरशा घरट्यात मादीचं बाळंतपण होतं.. फक्त जोडीदाराच्या साथीनं..

ना मादीचे आई वडील मदतीला असतात ना सासुसासरे…

मादी अंडी उबवत असते तेंव्हा नर अन्न मिळवून आणतो मादीसाठी नि स्वत:साठी..

” मी कमावता आहे बरं का, मी सांगेन तसच झालं पाहिजे ” असला कोणताच अहंकार त्याच्यात नसतो..

” माझं कमावणं बंद झालं.. माझी अस्मिता आता धोक्यात येईल का ?” असली असुरक्षितता ना तिच्यात असते..

 

अंड्यातून पिल्लं बाहेर येतात.. तरीही त्यांचे बाबाच अन्नार्जन करीत असतात..

पिल्लं मोठी होतात..

पिल्लांची आई अंडी उबवून उबवून स्वत:च उबलेली असते..

 

” राणी, तू कंटाळली असशील नं? 

तुझे पंख भरारी घेण्याचं विसरण्याआधीच मोकळ्या आकाशात मस्त उड्डाण कर.. खूप उंचावर जा.. पिल्लांचं उदरभरण करायची जबाबदारी आता तुझी…. आणि हो, आपल्या बछड्यांची आजिबात काळजी करू नकोस.. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता माझी.. “

 

गरूडच ती.. तिचे पंख झेप घेणं विसरलेले नसतात. ती मोकळ्या आकाशात विहरत राहते.. पिल्लांना आवडणारं, त्यांना सशक्त बनवणारं अन्न गोळा करते.. पण त्या माऊलीचं लक्ष मात्र त्या विस्तीर्ण आकाशातून तिच्या पिल्लांकडेच असतं!!

” माझे काळजाचे तुकडे भांडत नाहीत नं, त्यांना कुणी त्रास तर देत नाही नं, त्यांना कुठे दुखत खुपत नाही नं ?” सगळ्याचा ते मातृहृदय कोसांवरून अंदाज घेत असतं..

 

पिल्लांच्या पंखांत आता जोर आलेला असतो..

निळ्याशार आकाशात उडण्याची त्यांना घाई झालेली असते..

घरट्याच्या दाराशी यायचं, बाहेर डोकावायचं नि घाबरून आत पळून जायचं…. असले त्यांचे उपद्व्याप त्यांची माय प्रेमानं न्याहाळत असते..

 नि “माझं लेकरू घरट्यातून जमिनीवर पडणार तर नाही ना ?” म्हणून काळजीही करत असते..

 

बच्च्यांचे बाबा या वेळात घरट्याच्या खालच्या फांदीवर बसलेले असतात.. वृक्षाभोवती घिरट्या घालणा-या शत्रुंपासून आपल्या पोरांचं रक्षण करत…

 

पण ते तर त्यांना घरट्याशेजारीही बसूनही करता आलं असतं.. मग खालच्या फांदीवर का?

– – तर एखाद्या पिल्लानं अवखळपणानं घरट्यातून उडी मारली नि ते खाली पडायला लागलं तर त्याला झेलण्यासाठी…

त्याची ही पिल्लांना झेलण्याची, पकडण्याची क्षमता अजमावण्यासाठी म्हणून तर त्या आईने लेकरांना जन्माला घालण्याआधीच भावी पित्याची घेतलेली ती काडी परीक्षा.. !! – – काड्या पकडता आल्या म्हणजे या पात्राला पिल्लांना झेलता येणार….. केवढी ही हुशारी !!

 

“ती आकाशात विहरतेय उंचावर… मी मात्रं खालच्या पातळीवर रहायचं.. इतर पक्षी काय म्हणतील? माझ्यावर हसतील ? माझी प्रतिष्ठा कमी होईल ? गरुडीणबाई मला कमी लेखायला लागेल? माझा अपमान करेल? ” 

…… असले नगण्य, विकृत विचार त्याच्या आसपासही फिरकत नाहीत..

 

” मी फिरून फिरून कष्ट करतेय नि हा ठोंब्या नुसता बसून खातोय ” ना असल्या कोत्या विचारांचा तिच्या मेंदूत शिरकाव होत…

 

त्या दोघांचं एकच लक्ष्य असतं..

” पिल्लांचं संगोपन नि संरक्षण “…. ना त्यांना अहंकार असतो ना जगाची फिकीर..

 

त्या़ना माहीत असतं … आपल्या पिल्लांना आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणीही नाहीये..

आपण जन्म दिलाय तर ते स्वतंत्र होईपर्यंत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी हे आपले एकमेव कर्तव्य आहे.. म्हणूनच ते कर्तव्य ते जगाची फिकीर न करता पार पाडतात..

यात कधी मादी कमीपणा घेते तर कधी नर…

 

एकदा का पिल्लं उंच भरारी मारून जगाच्या पसा-यात नाहीशी झाली की मग दोघे आपापल्या विश्वात गायब होतात..

पण तोपर्यंत दोघांचं फक्त एकच विश्व ” मिशन बाळोबा !! “

गरुडांच्या या शहाणपणाची गोष्ट मी काल माझ्या नव-याकडून ऐकली. नि वाटलं…

गरुडाच्या दसपट मोठा नि प्रगत मेंदू असणा-या माणसाला हे शहाणपण का बरं येत नाही?

वंशसातत्याच्या उद्देशानं केलेल्या विवाहनामक प्रक्रियेत होणा-या बाळांपेक्षा पैसा, शिक्षण, मालमत्ता, नातीगोती यांनाच का महत्त्व दिलं जातं?

 

– – नेहमी नरानं मादीपेक्षा जास्त उंचीवर असलं पाहिजे… दाणा पाणी मिळवण्याची जबाबदारी पुरुषानेच घेतली पाहिजे… असं का?

– – नराएवढी उंची गाठण्याचा मादीचा नि मादीपेक्षा उंच उडण्याचा नराचा अट्टाहास कशासाठी ?

– – कधी मादीनं उंच उडावं तर कधी नरानं..

– – दोघंही अहंकारापोटी उंच आकाशात भरा-या मारत बसले तर त्या बिचा-या लेकरांना कोण सांभाळणार? ती पडायला लागली तर त्यांना कोण झेलणार?

– – उबेची गरज असण्याच्या काळात माऊलीऐवजी कामवाली किंवा पाळणाघरातील मावशी त्यांच्यावर पंखांची पखरण करणार ? त्या विकत घेतलेल्या उबेने त्यांचे पंख बळकट होतील?

– – मी पडलो तर माझा बाबा मला झेलायला खाली उभा आहे, या खात्रीवर मारलेली पहिली भरारी यशस्वी होईल की अहंकाराच्या युद्धात घरटं सोडून निघून गेलेल्या तथाकथित बाप नामक प्राण्याच्या आठवणींचे कढ काढत बिचकत बिचकत आकाशातला प्रवेश सुखकर होईल… ?

लेखिका : नीला महाबळ गोडबोले, सोलापूर….

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments