मराठी साहित्य – कविता ☆ केल्याने होतं आहे रे – माझं माहेर गोंदावली ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ केल्याने होत आहे रे ☆

??? माझं माहेर गोंदावली ???

!! श्रीराम!!

चला माहेरा जाऊया

आला आईचा सांगावा

कंदी पेढे घेऊनिया

चला माहेरा जाऊया !!धृ.!!

 

काय वर्णावं माहेर

गोंदवलीच्या कुशीत

भेटायाला जातं मन

माझं सारखं खुशीत

मंदिरात आहे उभी

चैतन्याची ग ती छाया

होई आनंद मनाला

चला माहेरा जाऊया!!१!!

 

चला माहेरा जाऊया

महाप्रसाद घेऊया

तीर्थप्रसादाने येते

शुद्धी अंत:करणाला !

शिरु कुशीत आईच्या

तिला गुपित सांगूया

माता चैतन्य भेटली

खूप आनंदी होऊया!!२!!

 

महाप्रसाद इथला ,

जणू काला पंढरीचा !

भक्तीभावाने खाताना ,

लाभे प्रसाद रामाचा !!

इथं आल्यावर पडे,

घरादाराचा विसर !

झूल्यावर बसूनिया ,

झोके सुंदर घेऊया !!३!!

 

चला माहेरा जाऊया

श्रींची आरती ऐकूया

सामुदायिक जपाला

सहभागी होऊनिया!!

नाम सहस्त्र विष्णूंचे

घेती भक्त येऊनिया

रामनामी रंगूनिया

चला माहेरा जाऊया !!४!!

रामनामी रंगूनिया

चला माहेरा जाऊया !!

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈