(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी की गुरूपौर्णिमा पर विशेष चारोळी लेखन। )
☆ गुरुपौर्णिमा . . . ! ☆
ज्ञानार्जन, ज्ञानदान
नित्य हवे देणे घेणे
शिकविते चराचर
ज्ञान सृजनाचे लेणे. . . . !
गुरू रूप ईश्वराचे
जगण्याचा मार्ग देते.
कृपा प्रसादे करून
सन्मार्गाच्या पथी येते. . . . . !
गुरू ईश्वरी संकेत
संस्काराची जपमाळ
शिकविते जिंकायला
संकटांचा वेळ, काळ. . . . . !
चंद्र प्रकाशात जसे
तेज चांदणीला येते
पौर्णिमेत आषाढीच्या
व्यास रूप साकारते.. . . !
माणसाने माणसाला
घ्यावे जरा समजून
ऋण मानू त्या दात्यांचे
गुरू पुजन करून. . . . !
संस्काराचा ज्ञानवसा
एक हात देणार्याचा
पिढ्या पिढ्या चालू आहे
एक हात घेणार्याचा.
असे ज्ञानाचे सृजन
अनुभवी धडे देते
जीवनाच्या परीक्षेत
जगायला शिकविते. . . !
ज्ञानियांचा ज्ञानराजा
व्यासाचेच नाम घेई.
महाकाव्ये , वेद गाथा
ग्रंथगुरू ज्ञान देई. . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.