कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 139 – विजय साहित्य
☆ श्रावण डहाळी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(रोज एक श्रावण कविता)
आली श्रावणाची सय
देई कवितेस थारा
शुष्क देहात नांदतो
आठवांचा ओला वारा..!
बघ श्रावणाची मौज
करी चित्राला साकार
प्रतिबिंब जाणिवांचे
रेखाटतो चित्रकार….!
झाला श्रावण अनंग
जपे भावनांचा रंग
उलगडे अनवट
कलावंत अंतरंग…!
बघ श्रावण सौंदर्य
राखी झाडाशी ईमान
सुकलेल्या कायेतून
देते झाडा जीवदान…!
एक श्रावण डहाळी
जोजवते तीन काळ
गर्द हिरव्या क्षणांची
तिच्या काळजात माळ…!
© कविराज विजय यशवंत सातपुते
१९/८/२०२२
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈