कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 146 – विजय साहित्य
☆ ओवीबद्ध रामायण – खंड सीता स्वयंवर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(काव्य प्रकार – साडेतीन चरणी ओवी)
रामचरणांची ख्याती, पसरली सर्व दूर
कौतुकाचा एक सूर, मिथिलेत….!
राजा मिथिलापतीचे, विश्वामित्रा निमंत्रण
धर्मकार्या आमंत्रण, जनकाचे…..!
अलौकिक विहंगम, परिसर रमणीय
सौंदर्य ते स्पृहणीय, मिथिलेचे….!
धर्मनिती परायण, यज्ञकार्यी योगदान
शिवधनुष्याचा मान, जनकास….!
पवित्र ते शिवधनू, पुजनीय जनकाला
दिगंतश्या प्रतापाला, तोड नाही…!
दाशरथी युवराज, विश्वामित्र मुनिजन
मिथिलेत राममन, विसावले….!
राजनंदिनी सीतेच्या, स्वयंवराचा सोहळा
जमलासे गोतावळा, नृपादिक….!
भव्य दिव्य राजवाडे, गुढ्या तोरणे पताका
दुजी अयोध्या शलाका, भासतसे….!
मिथिलेत सौख्य पूर, सुवर्णाची छत्रछाया
दरवळे गंधमाया, कस्तुरीची….!
स्वयंवराची तयारी, मिथिलेत उत्साहात
प्रवेशले नगरात, रघुनाथ…!
सीता जनकनंदिनी, स्वयंवर रचियले
शिवधनू ठेवियले, पणासाठी…!
सीता जगतजननी, स्वयंवराचा हा घाट
पहा किती थाट माट, मिथिलेत…!
आदिनाथ रामरूप, सीता दर्शनात दंग
आदिशक्ती भवबंध, एकरूप….!
भरलासे दरबार, शिवधनुष्य भेदन
झालें गर्वाचे छेदन, राजधामी….!
लक्ष गजबल खर्ची, शिवधनू आणविले
स्वयंवरे आरंभले, जनकाने….!
शिवधनुष्याचे धूड, पेलवोनी पेलवेना
जिंकण्यास उचलेना, दिव्य धनू…..!
उचलेना शिवधनू, असफल ठरे शौर्य
अपमाने जागे कौर्य, नृपनेत्री….!
एक एक नृप येई, लावी सारे आत्मबल
सारे नृप हतबल, पणापाई….!
अवघड ठरे पण, चिंतातूर राणीवसा
आसवांनी भरे पसा, आशंकेने…!
सुकुमार जानकीस, मिळणार कोण वर
उंचावला चिंतास्वर, मंडपात….!
कुठे गेले क्षात्रतेज, कुठे गेले नृप वीर
झुकले का नरवीर, धनूपुढे…..!
गुरूआज्ञा घेऊनीया, रघुनाथ पुढे आले
जन चिंताक्रांत झाले, सभागृही…!
विनम्र त्या, सेवाभावे, धनू लिलया पेलले
लाखो नेत्र विस्फारले, रामशौर्यी…..!
कडाडत्या वज्राघाती, रामे प्रत्यंचा लावली
टणत्कारे थरारली, वसुंधरा…!
बलशाली त्या धनुचे, दोन तुकडे करुन
पण घेतला जिंकून, रामचंद्रे….!
अचंबित प्रजाजन, हादरले नृपवर
राम जिंके स्वयंवर , अकस्मात…!
राजगृही शंखनाद, झाला आनंदी आनंद
लज्जा कमलाचे कंद, सीतानेत्री…!
अधोवदनी सीतेचे, मोहरले तनमन
आला सौभाग्याचा क्षण, स्वयंवरे…!
घेऊनीया हाती माला, सीता घाली वरमाला
राम जानकीचा झाला, भाग्यक्षण…!
याचं लग्न मंडपात, श्रृतकीर्ती भगिनीचे
उर्मिला नी मांडवीचे, लग्न झाले.
स्वयंवर जानकीचे, रामचंद्र जिंके पण
अलौकिक दिव्य क्षण, अंतर्यामी….!
(एक अलौकिक साहित्य निर्मिती आज खुली करीत आहे. ओवीबद्ध रामायण या खंडकाव्य लवकरच प्रकाशित होईल. आपले अभिप्राय अपेक्षित आहे. काही चुक असेल तरी मोकळेपणाने सांगा. संपूर्ण रामायण दीड हजार ओव्यांचे आहे. त्यांतील सीता स्वयंवर प्रसंग प्रस्तुत आहे.)
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈