कविराज विजय यशवंत सातपुते
☆ साप्ताहिक स्तम्भ # 78 – विजय साहित्य ✒सासू सून नात द्वाड.. . . !✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
सासू सून नातं द्वाड
आपसात चढाओढ
हक्क राखण्या शाबूत
प्रसंगाला होई गोड. . . . !
सासू सून नातं द्वाड
विळी भोपळ्याची जोड
सख्य नसताना होई
तू तू में में सडेतोड. . . . !
सासू सून नातं द्वाड
विचारांची तोडफोड
स्वार्थासाठी होत असे
रागलोभ धरसोड. . . . !
सासू सून नातं द्वाड
कुरघोडी बिनतोड
नाही आजार तरीही
डोस औषधांचा गोड. . . !
सासू सून नातं द्वाड
वादातीत डोकीफोड
जुन्या नव्या बदलात
रोज नवी चिरफाड. . . . !
सासू सून नात द्वाड
जशी लोणच्याची फोड
जसे मुरते तसे रे
होई संसार तो गोड. . . . !
सासू सून नात द्वाड
जसे बाभळीचे झाड
काट्याकाट्यात फुलते
सुखी संसाराचे बाड. . . . . !
© विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈