कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 83 – विजय साहित्य ☆ ओवी बद्ध रामायण – काही ओव्या  ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(ओवी बद्ध रामायण या खंडकाव्य यातील काही ओव्या… काव्य प्रकारसाडे तीन चरणी ओवी)

 

धर्मपरायण राजा , शोभे अयोध्या नरेश

अवतारी परमेश , राजगृही.. . !  25

 

पोटी नाही पुत्र सौख्य, पूर्ण व्हावे मनोरथ

खंतावला दशरथ,  मनोमनी. . . !   26

 

वसिष्ठांना पाचारण काश्यपांना निमंत्रण

जाबालींना आमंत्रण, धर्मकार्ये.. . !  27

 

पुत्रकामेष्टीचा यज्ञ,  शृंगऋषी पुरोहित

दथरथे समर्पित, यज्ञाहूती . . . !  28

 

गोरस नी गोधृताने, आरंभीला यज्ञयाग

यथोचित द्रव्यभाग, केला दान.. !   29

 

दानधर्म, कुलाचार,  आणि पुण्याहवाचन

वेदमंत्रांचे पठण,  यज्ञस्थली.. . !   30

 

अग्निदेव प्रगटले ,  दिले पायसाचे दान

पुत्रसौख्य वरदान, चिरंजीवी  . . . !  31

 

आनंदल्या तिन्ही राण्या, केले पायस भक्षण

गर्भी आले नारायण,  कौसल्येच्या.. . ! 32

 

चैत्र मासी नवमीस , राणी कौसल्येस राम

आनंदाने भरे धाम , जन्मोत्सव . . !  33

 

माध्यान्हीला जन्मोत्सव  कौसल्येचे नुरे भान

रामजन्मी गाती गान, प्रजाजन   . .!  34

 

सूर्यवंशी रामराया , विष्णू रूप अवतार

बालरूप  अंगीकार ,मोहमयी . . . ! 35

 

राजा दशरथापोटी ,जन्मा आले पुत्र चार

झाला राम  अवतार,  अयोध्येत .. !  36

 

चार पुत्र तेजोमय, यश, कीर्ती समाधान

विष्णूरूप शोभे सान,  रामचंद्र … ! 37

 

माता कौसल्येचा राम, राम सुमित्रा नंदन

चाले वात्सल्य मंथन,  कैकेयीचे.. . !  38

 

लक्षुमण , शत्रुघ्नाची, सुमित्रेस लाभे ठेव

वात्सल्याचे फुटे पेव, बालांगणी . . !  39

 

राजराणी कैकयीने , दिला जन्म भरताला

धन्यवाद संचिताला,  पुत्रजन्मी.. . ! 40

 

राम लक्षुमण जोडी, शत्रुघ्नाचा बंधुभाव

भरताच्या ह्रदी ठाव, स्नेहपाश .. . ! 41

 

धन्य कौसल्या जननी , हट्ट करी नारायण

आसवांचे पारायण , राम कुक्षी. .!  42

 

जगावेगळेच खेळ, हवे विश्व खेळायला

राम लागे मागायला ,साप दोरी . . ! 43

 

आकाशीचा चंद्र मागे,बाललीला बालपणी

दमवतो रघुमणी, प्रासादास  . . ! 44

 

काय वर्णू बालरूप , हरितेज सामावले

नरदेही विसावले ,परब्रह्म   . . !  45

 

दुडू दुडू धावताना, प्रासादाचे होई रान

हरपले देहभान, रामरंगी   . . . !  46

 

वात्सल्यात तिन माता, बालहट्टी सुखावल्या

रामरंगी तेजाळल्या , दिन रात.. !  47

 

रघुकुल शिरोमणी, वेड लावी चक्रपाणी

कौतुकाची बोलगाणी ,  आप्तेष्टांची .! 48

 

राजा दशरथ धन्य, धन,धान्य करी दान

वस्त्र, दक्षिणा, गोदान, मुक्तहस्ते. . . ! 49

 

चार बोबडेसे वेद, दिसामासी झाले मोठे

बाल कुमार छोटे ,तेजाळले. . ! 50

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

खुप सुंदर ओव्या!