कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 105 – विजय साहित्य
☆ वाट ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
चंद्र लाजरा पहा, काय काय बोलतो
मेघ कुंतलातूनी, शब्द शब्द डोलतो… ||धृ.||
सांग तू मनातले, कोण आवडे तुला
छेड प्रीत मारवा, हास लाजऱ्या फुला
हात दे हातात तू, पाय वाट सोडतो… ||१||
दोन चंद्र भोवती, सांग कोण देखणा
एक सांगतो मना, प्रेम पुष्प वेचना
ये अशी समीप तू, भाव रंग वाचतो… ||२||
कला, कळा अंतरी, भावती तुला मला
शब्द श्वास जाहला, दाटला पुन्हा गळा
पौर्णिमा मनातली, प्रीत स्पर्श जाणतो..||३||
रात राणी सोबती,देई साक्ष चांदवा
भावना मनातल्या, प्रेम रंगी नांदवा
भेट तू पुन्हा पुन्हा, मीच वाट पाहतो..||४||
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈