कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 122 – विजय साहित्य
☆ जीवनवेणू ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(दशाक्षरी रचना)
सप्तसुरांची, अवीट गोडी
या जीवनाच्या, सुरावटीला
जगणे आहे ,मंजुळ पावा
सुखदुःखाच्या, सजावटीला….! १
नको फुकाचे, मानपान ते
माणूस होतो, माणूस राहू
हात देऊया, संकट काळी
ईश्वर भक्ती, जनांत पाहू….! २
वाचू माणूस,जाणू माणूस
वृद्धाश्रम तो , दूर ठेऊया
जीवन यात्रा, माय पित्यांची
सवे आपुल्या, सुखे नेऊया…! ३
गुरू जनांची, ज्ञान शिदोरी
पाया भरणी, विचारधारा
प्रलोभनांचे , नको दागिने
व्यसनी संगा, नकोच थारा…! ४
जबाबदारी, अन् कर्तव्ये
डावे उजवे, हात आपुले
न्याय नितिचे, विचार सोपे
ध्येयवादी ही,टाक पाऊले…! ५
काय सांगते, जीवन वेणू
मनी वाहू दे, प्रेमळ वारा
सात सुरांची,सुरेल वाणी
अनुभूतींची, जीवनधारा….! ६
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈