कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 126 – विजय साहित्य
☆ गोडवा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(नदी या विषयावरील रचनां… सागर नदी विषयी बोलतो आहे..)
असंख्य सरिता येऊन मिळती
जलाशयी आगरा
तरीही का मी अथांग खारट ?
चिंता पडे सागरा
प्रवास करूनी जीवन अवघे
वाटत येते नदी ..
लपवीत नाही, कणभर काही
दानशूर ती नदी ..!
समुद्र फळांची, राखण करतो
संचय खारा उरी
गोड नदीचा, होतो सागर
खारट जल ना उरी.
नदी अविरत , उधळीत येते
जीवन वाऱ्यावरी
रत्नाकर मी, दडवीत राही
माणिक रत्ने, नाना परी
जीवनावरती, उदार होऊन
गावोगावी वसते, अभ्यंतरी
म्हणून राहतो ,भरून गोडवा
नदी , तुझ्या अंतरी..!
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈