कवितेचा उत्सव
☆ स्मृतीदिना निमित्त -पाहुणचार… ☆ ग. ल. ठोकळ ☆
या बसा पाव्हनं असं, रामराम घ्या !
कोनच्या तुम्ही गांवाचं ? गाठुडं तिठं राहुं द्या !
घोंगडी टाकली इठं, बसा तीवर
अनमान करुं नका आतां, हें समजा अपुलं घर
वाढूळ चालतां जनूं, लई भागलां
हें पगा, काढलंय पाणी, आंघूळ कराया चला
आटपा बिगीनं जरा, ताट वाढलं
पाव्हनं, चला या आतां, हें पगा पिढं टाकलं
वाढली पगा ज्वारिची जाड भाकरी
निचितीनं जेवा आतां, जायचं न शेतावरी
लइ सुगरण मपली बरं कारभारिण
किती अपरुक झालं हाए, हें कांद्याचं बेसन !
लसणीची चटणी उजुन पगा वाढली
ती मधून तोंडी लावा, लागती तिखट चांगली !
चापून अतां होउं द्या, करुं नका कमी
मीठभाकरी गरीबाची, घ्या गोड करोनी तुम्ही
इकत्यांत कसं उरकलं? हें नव्हं खरं
आनकी येक चतकोर, घ्यायला पाहिजे बरं !
कां राव हात राखुनी असं जेवतां ?
ए अगS वाढ कीं त्यांना, हां ब्येस जाहलं अतां !
हो, झालंच आतां, उठा, चला भाइर
घ्या हातावरतीं पाणि, नी बसा पथारीवर
पाव्हनं, नीट भिंतिला बसा टेंकुनी
हें खांड घ्या सुपारीचं, घ्या तोंडामदिं टाकुनी
ही भरली चिलमीमदीं तमाखू अहा !
पेटली कशी पण नामी, झुरका तर घेउन पहा
जायचं काय म्हंगतां ? झोंप घ्या जरा
जाताल उद्यां, कां घाई ? छे, बेत नव्हं हा बरा
भारीच तुम्ही हे बुवा, जायचंच का ?
तारीख चालली वायां, गरिबाचं ऎकु नका
शेवटीं निघालांत ना ? जपूनीच जा
गरिबाची ओळख ठेवा, या बरं, रामराम घ्या !
– ग. ल. ठोकळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈