श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ शापीत मी… ☆
तुझी मी घेउनी स्वप्ने उशाशी झोपतो आहे
मिटाव्या पापण्या म्हणुनी किती कुरवाळतो आहे
पहा तो चंद्रही गेला कधीचा झोपण्यासाठी
असा शापीत मी येथे कशाला जागतो आहे
तिने हृदयावरी माझ्या असे गारूड केलेले
इथे तर श्वासही माझा तिच्यावर भाळतो आहे
स्वतःचे नित्य जगणेही तिच्या केले हवाली अन्
स्वतःच्या भोवती आता स्वतःला शोधतो आहे
गराडा घातला आहे मला ह्या प्रेमवेड्यांनी
नका नादास लागू रे म्हणूनी सांगतो आहे
विषाची घेतली आहे परीक्षा आज स्वेच्छेने
विषासाठीच देहाला अता मी सोडतो आहे
शरीराने जरी नसलो तरी आत्मा इथे आहे
तुला सोडून जाण्याला मला तो रोखतो आहे
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈