मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घर कसं असावं? ☆ रमण रणदिवे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ घर कसं असावं? ☆ रमण रणदिवे ☆

केवळ अपुल्या स्वार्थासाठी

कलह नसावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

येणार्‍याला पाणी द्यावे

स्वागतातही गोडि हवी

जाणार्‍याच्या मनांत फिरुनी

येण्यासाठी ओढ हवी

ऐसा प्रेमळ माणुसकीचा

झरा वहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

भांड्याला लागतेच भांडे

विसरुन जावे क्षणामधे

परस्परांना समजुन घ्यावे

अढी नसावी मनांमधे

रुसवे फुगवे नको फुकाचे

मोद रहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

 

नित्य काळजी घरात घ्यावी

वय झालेल्या पानांची

ज्याची त्याला द्यावी जागा

वयाप्रमाणे मानाची

एकमताने निर्णय घ्यावे

नको दुरावा मनामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈