श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ काजळ… ☆
किती दिवस मी शोधत होतो सापडलो मी आज मला
किती चुकांचा डोंगर माथी समजत होतो तरी भला
नश्वर देहालाही माया मोहाने या गुरफटले
मुक्कामाची वेळ संपली पुन्हा जाउ या घरी चला
भ्रष्टाचाराच्या खड्ड्याने बळी घेतला असा तुझा
आज निघाला ज्या रस्त्याने तो तर आहे धुक्यातला
ओठ टेकले स्पर्श जाहला बर्फाच्या ह्या गोळ्याला
कुठेच नव्हती आग तरीही बर्फ कसा हा पाघळला
कलेकलेने रूप बदलले शृंगाराचा साज नवा
पुनवेची ही रात्र घेउनी चंद्र नव्याने अवतरला
ओढ लागली मला घराची अंगणात मी अवतरले
नव्हे गालिच्या माझ्यासाठी जीवच त्याने अंथरला
जळल्यानंतर भाग्य उजळले त्यातुन झाला काजळ तो
आणि सखीच्या नेत्री आहे मुक्तपणे तो वावरला
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈