श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 119 – बाळ गीत – चिऊ ताईचे बाळ ☆
चिऊ ताईचे चिमणे बाळ
चिव् चिव् बोले।
काग आई आज तुझे
डोळे असे ओले।
चिऊ ताईचा कंठ आज
थरथरू लागला ।
काय सांगू बाळा माझा
जीव तुझ्यात गुंतला।
काडी काडी जमवून
आम्ही, घरटे बांधले ।
कापसाचे मऊ मऊ
गालिचेही सजले।
बाळा तुझ्या येण्याने
घरटे आनंदले ।
तुझ्या हस्यामध्ये माझे
दुःख सुारे विरले।
कण कण टिपून तुला
प्रेमे वाढविले।
आकाश पेलणारे सुंदर
पंख तुला फुटले।
बाळा उंच आकाशी
भरारी घेशील।
रंगीबेरंगी स्वप्नांच्या
रगात रंगून जाशील।
तुझ्याविना बाळा पुन्हा
घरटे सुने होईल।
आठवणीने जीव कसा
कासावीस होईल।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈