कवितेचा उत्सव
☆ अवकाळी पाऊस… ☆ मेहबूब जमादार ☆
भर सुगीत आली
पावसाची कथा
पिक गेलं वाहून
कुणा सांगू ही व्यथा
पिक फुलता रानी
थके त्याला स्मरून
हाती येता पिक
येतं आभाळ भरून
गेलं अंधारून सारं
चित्त विरलं धुक्यात
पाणी भरल्या रानांत
गेली वाट हरवत
कसं पडतं सपान
तुला आलेल्या सुगीचं
का रे तुला समजेनां
गुज दडल्या मनींच
हरसाली हिच त-हा
तरी असतं तूझं येणं
किती विणवलं तरी
वरं तूझं कडाडणं
डोळं भरूनिया गेलं
तरी नाही परतावा
सांग? शेतकरी राजानं
हात कुठे पसरावा
– मेहबूब जमादार
मु -कासमवाडी पो .पे ठ जि .सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈