श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 165
खिळा भिंतीला ठोकला, आत वीट हादरली
हातोड्याने पुन्हा पुन्हा, वीट किती पोखरली
भिंत सांभाळे घराला, ऊन्ह-वात करे तोरा
बाहेरून पावसाने, भिंत किती झोडपली
आहे जखमांचा वावर, दुःख छळतंय भारी
नव्हे भिंतीला पोपडा, आहे खपली धरली
नको विश्वास ठेवाया, रंगावरती वरच्या
आत डोकावून पाहू, भिंत आतून खचली
कौल बापाच्या सारखा, असे हात डोईवर
होती सावली आधार, म्हणून ती सावरली
वासा छताच्या खालचा, त्यास भय वाळवीचे
विरोधाला जुमानेना, लाकडे हि पोखरली
दिसे विटांचा सांगाडा, छत उडून गेलेले
पायाखालच्या मातीत, भिंत आज विसावली
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈