श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ गत जन्मीचे… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
गत जन्मीचे हिशोब चुकते करायचे तर
हवी कशाला व्यर्थ सुखाची मार्ग प्रतीक्षा?
अशा पापण्या भिजवायला हव्या तुला तर
दिलीं कशाला एकांताची जबरी दीक्षा?
पद चिन्हावर शिंपशील नयनातील पाणी
म्हणून चालतो याच पथावर मी अनवाणी
मार्ग चालता पुढे पुढे मन वळते मागे
अन पायाला घट्ट बिलगती कच्चे धागे
आशेचा तू वृक्ष लाविला होता दारी
कैक दिसानी आज बहरला मागील दारी
या वृक्षाचा बहर भिडावा. नील नभाला
मिळो सावली क्षण सौख्याची पांथस्थाला
गर्द सावली विस्ताराची भूल जगाला
भार तोलते मुळी तियेची खंत कुणाला?
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈