मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “द्वैत…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ “द्वैत…” ☆ श्री आशिष मुळे ☆

खेळून खेळून लपंडाव कंटाळलो आहे

घेऊन सारखं सारखं राज्य वैतागलो आहे

भिंतीमागे कधी साद देतोस अनाहत नादात

नेहमी भासवतोस भास शब्दांच्या गवतात

धरायला जातो तुला जेव्हा झाडामागे

दिसतात तेव्हा विंचू लपलेले दगडामागे

ती माया मला नेहमी लांबून खिजवते

धावतो मग चिडून तुझ्या त्या मैत्रिणीच्या मागे

 

तुला फसवून बाहेर आणायला काय नाही केलं

गोड गोड स्तुती करणारी तुझी गाणी म्हटली

मंत्रमुग्ध करणारी सुगंधी काडी जाळली

पण तू आहेस आपल्या सगळ्यात हुशार

घेत नाहीस सहजी कोणाचाही कैवार

खरं सांगू, मला तुझा फायदा नको आहे

फक्त हात तुझ्या दोस्तीचा हवा आहे

 

पुरे झाला रे आता हा लपंडावाचा त्रागा

फिरवल्यासना मला सगळ्या जागा

किती काळ झाला आपण खेळतोय

याचा काहीच हिशोब नाहीये

किती वेळ अजून खेळणारे

याचा काहीच अंदाज नाहीये

जाऊ रे आता परत आपल्या घरी

संपव क्षणात तुझ्या माझ्यातली दरी…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈