श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 143 ☆ संत एकनाथ… ☆ श्री सुजित कदम ☆
भानुदासी कुळामध्ये
जन्मा आले एकनाथ
जनार्दन स्वामी गुरु
शिरी गुरुकृपा हात.! १
दत्त दर्शनाचा योग
देवगिरी सर्व साक्षी
तीर्थाटन करूनीया
आले पैठणच्या क्षेत्री..!२
अध्यात्माची कीर्तंनाची
एकनाथा होती ओढ
अध्ययन पुराणांचे
शास्त्र अध्यात्माची जोड…! ३
नाथ आणि गिरिजेचा
सुरू जाहला संसार
गोदा,गंगा, आणि हरी
समाधानी परीवार…. ! ४
साडेचार चरणात
एकनाथी ओवी साज
स्फुट काव्य गवळण
दिला आख्यानाचा बाज…! ५
गेय पद रचनेत
एकनाथी काव्य कला
सुबोधसा भाष्यग्रंथ
भागवती वानवळा..! ६
शब्द चित्रे कल्पकता
एकनाथी व्यापकता
धृपदांची वेधकता
लोककाव्य विपुलता..! ७
एकनाथी साहित्याने
दिलें विचारांचे धन
गुरूभक्ती लोकसेवा
समर्पिले तन मन…! ८
नाट्यपुर्ण कथा काव्य
वीररस विविधता
भारुडाच्या रचनेत
सर्व कष वास्तवता…! ९
बोली भाषेतून केले
भारूडाचे प्रयोजन.
लोकोद्धारासाठी केला
अपमान ही सहन…! १०
ईश्वराचे नाम घेण्या
नको होता भेदभाव
एकनाथी रूजविले
शांती, भक्ती, हरिनाम. ..! ११
नाना ग्रंथ निर्मियले
लाभे हरी सहवास.
विठू, केशव, श्रीखंड्या
नाथाघरी झाला दास. .! १२
भागवत भक्ती पंथ
बहुजन संघटित
शास्त्र आणि समाजाची
केली घडी विकसित…! १३
दत्तगुरू द्वारपाल
नाथवाडी प्रवचन
देव आले नाथाघरी
नाथ देई सेवामन…! १४
केले लोक प्रबोधन
प्रपंचाचे निरूपण.
सेवाभावी एकनाथ
भक्ती, शक्ती समर्पण. ! १५
शैली रूपक प्रचुर
मराठीचा पुरस्कार
कृष्ण लिला नी चरीत्र
भावस्पर्शी आविष्कार…! १६
रामचरीत्राचा ग्रंथ
महाकाव्य रामायण
पौराणिक आख्यायिका
जनलोकी पारायण…! १७
एकनाथी भागवत
नाथ करूणा सागर
एकनाथी साहित्यात
लोक कलेचे आगर…! १८
राग लोभ मोह माया
नाही मनी लवलेश
खरे अध्यात्म जाणून
अभ्यासला परमेश…! १९
नाथ कीर्तनी रंगल्या
गवळणी लोकमाता.
समाधीस्त एकनाथ
कृष्ण कमलात गाथा. ..! २०
वद्य षष्ठी फाल्गुनाची
नाथ षष्ठी पैठणची
सुख,शांती,धनसौख्य
नाथ कृपा सौभाग्याची..! २१
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈