श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 135 – बाळ गीत – शाळेत जाऊ द्याल का ? ☆
आई बाबा आई बाबा
पाटी पेन्सिल घ्याल का!
पाटीवरती घेऊन दप्तर
शाळेत जाऊ द्याल का!
भांडी कुंडी भातुकली
आता नको मला काही।
दादा सोबत एखादी
द्याल का घेऊन वही।
नका ठेऊ मनी आता
मुले मुली असा भेद।
शिक्षणाचे द्वार खोला
भविष्याचा घेण्या वेध।
कोवळ्याशा मनी माझ्या
असे शिकण्याची गोडी।
प्रकाशित जीवन होई
ज्योत पेटू द्या ना थोडी।
पार करून संकटे
उंच घेईल भरारी।
आव्हानांना झेलणारी
परी तुमची करारी।
सार्थ करीन विश्वास
थोडा ठेऊनिया पाहा।
थाप अशी कौतुकाची
तुम्ही देऊनिया पाहा
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈