श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 144 ☆ संत गोरोबा कुंभार… ☆ श्री सुजित कदम ☆
चमत्कार चैतन्याचे
संत गोरोबा साधक
तेर गावी जन्मा आली
संत विभुती प्रेरक..!..१
संत जीवन दर्शन
विठू भक्ती आविष्कार
प्रतिकुल परिस्थिती
संत गोरोबा साकार…! २
भक्ती परायण संत
पांडुरंग शब्द श्वास
देह घट आकारला
विठू दर्शनाचा ध्यास..! ३
तुझें रूप चित्ती राहो
वेदवाणी गोरोबांची
भक्ती श्रध्दा समर्पण
गोडी देह प्रपंचाची…! ४
व्यवसाय कुंभाराचा
नित्य कर्मी झाले लीन
बाळ रांगते जाहले
माती चिखलात दीन…! ५
तुडविले लेकराला
विठ्ठलाच्या चिंतनात
तोडियले दोन्ही हात
प्रायश्चित्त संसारात…! ६
संत गोरोबा तल्लीन
संकीर्तनी पारावर
थोटे हात उंचावले
झाला विठूचा गजर…! ७
कृपावंत विठ्ठलाने
दिला पुत्र दोन्ही कर
भक्त लाडका गोरोबा
संतश्रेष्ठ नरवर…! ८
मानवांच्या कल्याणाचा
ध्यास घेतला अंतरी.
स्वार्थी लोभी वासनांध
असू नये वारकरी…! ९
देह प्रपंचाचा ध्यास
उपदेश कार्यातून
संत सात्विक गोरोबा
वर्णियेला शब्दातून…! १०
परब्रम्ह लौकिकाचे
संत रूप निराकार
आधी कर्म मग धर्म
काका गोरोबा कुंभार..! ११
संत साहित्य प्रवाही
अनमोल योगदान
अभंगांचे सारामृत
अलौकिक वरदान…! १२
चैत्र कृष्ण त्रयोदशी
तेरढोकी समाधीस्त
पांडुरंग पांडुरंग
नामजपी आहे व्यस्त..! १३
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈