सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ माय मराठी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
माय मराठी भाषेचा
वाजे जगभर डंका
तिच्या रंग-रूपाला चढे
अलंकारीत साज नवखा
भाव थोर मनी जपावा
माय मराठी बोलीचा
मुखातून गोड यावा
शब्द शब्द थोरवीचा
माय मराठीची महती
शिळा सह्याद्रीच्या गाती
समुद्राच्या लाटांसंगती
अमृत होऊन फेसाळती
माय मराठी आमुचा प्राण
आमुच्या बोलीचा अभिमान
इथे दर्याखोर्या घुमवती
माय मराठीपणाची आण
भजन,भारूड असो ओवी
गीतातून मराठी रूळती
मराठीची महान थोरवी
तुकोबा, ज्ञानोबास गौरवी
मराठी पाखरांच्या किलबिलात
मराठी सळसळ वार्यासंग
पानाफुलांच्या रंग-रूपात
मराठी नदी सागराचा खळखळाट
मराठी रूजावी मनामनात
मराठी नांदावी गावागावात
माझी थोर माय मराठी
नवखावी साऱ्या जगात
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈