श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 151 ☆ नरहरी दास…! ☆ श्री सुजित कदम ☆
विश्व कर्मा ब्राह्मणात
जन्मा आले नरहरी
वंश परंपरा थोर
श्रद्धा भक्ती परोपरी..! १
कर्ते मुरारी अच्युत
आणि कृष्णदास हरी
पणजोबा आजोबांची
कृपादृष्टी सर्वांवरी…..! २
सोनाराच्या व्ववसायी
पारंगत नरहरी
मुळ नाव महामुनी
शैव उपासना करी….! ३
संत नरहरी यांसी
जाहलासे साक्षात्कार
शिव विठ्ठल एकच
ईशकृपा चमत्कार….! ४
पांडुरंग परमात्मा
तोच शिव भगवान
नरहरी सोनारांस
प्राप्त झाले दिव्य ज्ञान. ५
शैव वैष्णवांचा त्यांनी
दूर केला विसंवाद
अध्यात्मिक अभंगाने
नित्य साधला संवाद .. ! ६
शतकात चौदाव्या त्या
शिवभक्ती आचरीली
संसारीक कार्य सिद्धी
सदाचारे स्विकारीली…! ७
उदावंत कुलातील
शिवभक्त चराचरी
संकीर्तनी असे दंग
अहोरात्र नरहरी…! ८
असे कुशल सोनार
निर्मीतसे अलंकार
हरी आणि हर दोघे
परब्रम्ह अवतार….! ९
शिव पिंडीमध्ये पाही
विठ्ठलाचे निजरुप
वैष्णवांचा दास सांगे
हरीहर एकरुप…! १०
एका सोनसाखळीने
घडविला चमत्कार
पाही रूप नरहरी
शिव पांडुरंगा कार…! ११
समरसतेचा पंथ
नाही मनी कामक्रोध
केला प्रचार प्रसार
भक्ती मार्ग नितीबोध…! १२
केली प्रपंचात भक्ती
अक्षरांत विठू माया
अभंगात गुंफीयली
दैवी हरीहर छाया…! १३
ज्ञानयोगी कर्मयोगी
नऊ दशके प्रवास
सुवर्णाचे अलंकार
अनुभवी शब्द खास…! १४
माघ कृष्ण तृतीयेला
पुण्यतिथी महोत्सव
हरिऐक्य दिन जगी
सौख्य शांतीचा उत्सव…! १५
पंढरीत महाद्वारी
समाधिस्थ नरहरी
नोंद भक्ती भावनांची
अभंगात दिगंतरी…! १६
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈