मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांधेजोड ☆ सौ.नीलम माणगावे

सौ.नीलम माणगावे

☆ कवितेचा उत्सव ☆ सांधेजोड ☆ सौ.नीलम माणगावे ☆ 

त्याच्या पांढऱ्या राजाला

मी असं कोंडीत पकडलं,

की एक पाऊल उचलणं त्याला कठीण होऊन बसलं

शरणागती पत्करून मागे जावं,

तर माझा घोडा

अडीच पावलं टाकून त्याला मारायला तयार होता

कसाही वार करण्याच्या पवित्र्यात

उजवीकडे प्रधानाने रस्ता आडवला होता

डावीकडे लांबवर तिरक्या चालीचा उंट

टपूनच बसलेला

बाकी सभोवती त्याच्याच सैन्याने त्याचा रस्ता रोखलेला

आता हरण्याशिवाय पर्याय नव्हता

बचावाच्या भूमिकेतून त्याने पुन्हा , चेक देऊन

खिंड लढवणार्या माझ्या सशक्त हत्तीला मारून

आपला रस्ता मोकळा केला

आणि त्याचक्षणी

माझ्या छोटुल्या प्याद्याने

त्याच्या राजाला उडवून टाकला

‘हरलास, तुझा राजा मेला..’मी म्हणताच

पडलं तरी नाक वर च्या अविर्भावात तो म्हणाला,

‘चल, आपण राजा नसताना खेळून पाहूया’

त्याच्या लक्षातही आलं नाही,

की जीवनात फक्त खेळच महत्त्वाचा नसतो

की नसते फक्त जीत

हरण्यातही गंमत असते

जोडीदाराच्या चेहऱ्यावरचा जेतेपदाचा आनंदही

बेड्या तोडण्याची नशा देते

खऱ्या अर्थाने.. ती सांधेजोड असते

मोकळ्या जागा भरून काढते

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈