श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 154 ☆ संत तुकाराम महाराज… ☆ श्री सुजित कदम ☆
माघ मासी पंचमीस
जन्मा आले तुकाराम
जन्मदिन शारदेचा
संयोगाचे निजधाम…! १
ऋतू वसंत पंचमी
तुकोबांचा जन्मदिन
जीभेवर सरस्वती
नाचतसे प्रतिदिन…! २
साक्षात्कारी संत कवी
विश्व गुरू तुकाराम
संत तुकाराम गाथा
अभंगांचे निजधाम…! ३
सतराव्या शतकाचे
वारकरी संत कवी
अभंगात रूजविली
भावनांची गाथा नवी…! ४
जन रंजले गांजले
त्यांना आप्त मानियले
नरामधे नारायण
देवतत्व जाणियले…! ५
तुकोबांची विठुमाया
कुणा कुणा ना भावली
एकनिष्ठ अर्धांगिनी
जणू अभंग आवली…! ६
सामाजिक प्रबोधन
सुधारक संतकवी
तुकोबांचे काव्य तेज
अभंगात रंगे रवी…! ७
विरक्तीचा महामेरू
सुख दुःख सीमापार
विश्व कल्याण साधले
अभंगाचे अर्थसार…! ८
केला अभंग चोरीचा
पाखंड्यांनी वृथा आळ
मुखोद्गत अभंगांनी
दूर केले मायाजाल…! ९
एक एक शब्द त्यांचा
संजीवक आहे पान्हा
गाथा तरली तरली
पांडुरंग झाला तान्हा..! १०
नाना अग्निदिव्यातून
गाथा प्रवाही जाहली
गावोगावी घरोघरी
विठू कीर्तनी नाहली…! ११
जातीधर्म उतरंड
केला अत्याचार दूर
स्वाभिमानी बहुजन
तुकाराम शब्द सूर…! १२
रूजविला हरिपाठ
गवळण रसवंती
छंद शास्त्र अभंगाचे
शब्द शैली गुणवंती..! १३
दुष्काळात तुकोबांनी
माफ केले कर्ज सारे
सावकारी पाशातून
मुक्त केले सातबारे….! १४
प्रपंचाचा भार सारा
पांडुरंग शिरावरी
तुकोबांची कर्मशक्ती
काळजाच्या घरावरी…! १५
कर्ज माफ करणारे
सावकारी संतकवी
अभंगात वेदवाणी
नवा धर्म भाषा नवी…! १६
प्रापंचिक जीवनात
भोगियले नाना भोग
हाल अपेष्टां सोसून
सिद्ध केला कर्मयोग…! १७
परखड भाषेतून
केली कान उघाडणी
पांडुरंग शब्द धन
उधळले सत्कारणी…! १८
अंदाधुंदी कारभार
बहुजन गांजलेला
धर्म सत्ता गुलामीला
जनलोक त्रासलेला…! १९
साधी सरळ नी सोपी
अभंगाची बोलगाणी
सतातनी जाचातून
मुक्त झाली जनवाणी…! २०
संत तुकाराम गाथा
वहुजन गीता सार
एका एका अभंगात
भक्ती शक्ती वेदाकार…! २१
सांस्कृतिक विद्यापीठ
इंद्रायणी साक्षीदार
प्रवचने संकीर्तनी
पांडुरंग दरबार…! २२
संत साहित्यांची गंगा
ओवी आणि अभंगात
राम जाणला शब्दांनी
तुकोबांच्या अंतरात. २३
साक्ष भंडारा डोंगर
कर्मभूमी देहू गाव
ज्ञानकोश अध्यात्माचा
नावं त्याचे तुकाराम…! २४
सत्यधर्म शिकवला
पाखंड्यांना दिली मात
जगायचे कसे जगी
वर्णियले अभंगात…! २५
युग प्रवर्तक संत
शिवराया आशीर्वाद
ज्ञानगंगा विवेकाची
तुकोबांच्या साहित्यात…! २६
सांप्रदायी प्रवचनी
नामघोष ललकार
ज्ञानदेव तुकाराम
पांडुरंग जयकार…! २७
नाना दुःख सोसताना
मुखी सदा हरीनाम
झाले कळस अध्याय
संतश्रेष्ठ तुकाराम…! २८
तुकोबांच्या शब्दांमध्ये
सामावली दिव्य शक्ती
तुका म्हणे नाममुद्रा
निजरूप विठू भक्ती…! २९
नांदुरकी वृक्षाखाली
समाधीस्थ तुकाराम
देह झाला समर्पण
गेला वैकुंठीचे धाम…! ३०
फाल्गुनाच्या द्वितीयेला
पुण्यतिथी महोत्सव
संत तुकाराम बीज
अभंगांचा शब्दोत्सव..! ३१
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈