सौ. नेहा लिंबकर
कवितेचा उत्सव
☆ गंध… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆
गंध मोगऱ्याचा, चाफ्याचा, गुलाबाचा
मंद मंद त्या वासाचा
गंध मृदगंधाचा, पावसाच्या सरींचा
गंधाळलेलया धुंद वार्याचा
गंध पराक्रमाचा, वीरांचा
इतिहासाचे क्षण जपण्याचा
गंध कोऱ्या करकरीत पुस्तकांचा
वाचनाने समृद्ध होण्याचा
गंध आजीच्या गोधडीचा
उबदार मायेत लपेटण्याचा
गंध आईच्या ममत्वाचा
कधीच न संपणाऱ्या मायेचा
गंध सप्त सुरांच्या मैफिलीचा
मंत्र मुग्ध श्रवण भक्तीचा
गंध उपासनेचा, पूजेचा
निर्गुणा पर्यंतच्या प्रवासाचा
गंध अन्नपूर्णेच्या रसाचा
चवी चवीने तृप्त होण्याचा
गंध हाकेच्या मैत्रीचा
मनमोकळ्या गप्पांचा अन् खळखळून हसण्याचा
गंध हिरव्या मायभूचा अन् देशाचा
अभिमानाने मान उंचावण्याचा
गंध सर्व आप्त परिवाराचा
नात्यांचा भावबंध बहरण्याचा
रंगुनीया गंधात साऱ्या
गंधमय जीवन जगण्याचा…
© सौ. नेहा लिंबकर
पुणे
मो – 9422305178
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Very nice Neha. Keep it up!