श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ तळ्याकाठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
निळ्या तळ्याच्या कडेला
माझे हेलावे अंतर
लाट धडके लाटेला
काटा माझ्या अंगावर
तळ्यातले पाणी होई
माझ्या मनाचा आरसा
कोंदटले मन माझे
इथे टाकते उसासा
झाड पाण्यात निरखी
आपलेच प्रतिबिंब
माझ्या काळजात खिळे
एक सय ओली चिंब
पाण्यावरी ओनावता
दिसे माझाच चेहरा
पाठमोऱ्या सावलीचा
रंग झाला गोरा गोरा
गंधाळला रानवारा
येतो वाजवीत पावा
माझ्या ध्यानीमनी घुमे
तुझ्या सादाचा पारवा
आठवता सारे सारे
माझी ओलावे पापणी
भर घालते तळ्यात
थेंब भर खारी पाणी
माझ्या तुझ्या आसवांची
अशी पडे गळामिठी
वाट पाहतो कधीचा
बसुनीया तळ्याकाठी
आला घोंगावत वारा
तुझा सुवास घेऊन
उठलेल्या तरंगानी
गेली प्रतिमा वाहुनी
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈