सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ कवितेचा उत्सव ☆ गझल – हौसच आहे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
अज्ञाताची अशी असोशी हौसच आहे
सुखासीनता ठोकरण्याची हौसच आहे
नाकापुढती चालत जगणे सोपे तरीही
अवघड आव्हाने घेण्याची हौसच आहे
मृदुमुलायम पायघड्यांची वाट सोडुनी
धोंड्यांमधुनी धडपडण्याची हौसच आहे
ऐषारामी नोकरीवरी लाथ मारुनी
रित्या खिशाचा कवी होण्याची हौसच आहे
नोकरीतली दगदग सरली निवांत जगणे
लष्करच्या रोट्या करण्याची हौसच आहे
शंभूधनुष्या बाण लावणे छंद असे हा
सूर्याचा गोळा गिळण्याची हौसच आहे
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈