श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठगीता… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

ज्ञानियाची एक ओवी

अमृताची भक्तिगंगा

धन्य सारी संततीर्थे

प्राप्त मोक्षत्व अभंगा !

 

अटकेपारही झेंडे

शिवबाच्या मावळ्यांचे

समशेरींना वंदन

शाहिरांच्या पोवाड्यांचे !

 

वीररसाच्या संगती

शोभे शृंगार साजिरा

लावणीच्या वसंतात

येई लावण्य मोहरा !

 

साध्यासोप्या रूपकांचा

होई संदेश भारूड

गौळणीचे रूपरंग

भक्तिपीठाचे गारूड !

 

लोकगीतांच्या धारांचे

स्थानमहात्म्य आगळे

ओल्या मातीचा सुगंध

शब्द , सूरात दरवळे !

 

माय रात्रीचा गंधर्व

झोपे पाळण्यात बाळ

झरा अंगाईचा वाहे

स्वप्नीसुद्धा झुळझूळ !

 

कोण्या केशवाचा सुत

गेला फुंकून तुतारी

कोण्या कुसुमाग्रजाची

भव्य दिगंत भरारी !

 

पुनर्जन्म वाल्मिकीचा

जन्मे गीतरामायण

रामकथेचे उत्कट

घरोघरी पारायण !

 

ऋतुरंग ओलेचिंब

कुण्या जिप्सीच्या कवनी

कंठी आनंदयात्रीच्या

भावभावनांची गाणी !

 

निरक्षरा अक्षराची

लाभे संजीव मोहिनी

मृदगंधा नभापार

नेई बहिणाई कोणी !

 

प्रभंजन मर्ढेकरी

प्रतिमांची ढगफुटी

अभिव्यक्तीस मोकाट

आशयाच्या दिशा दाही !

 

दीन वंचितांचे लाव्हे

आली होऊन तुफाने

हादरले सारस्वत

‘गोलपीठा’च्या स्फोटाने !

 

संध्यागीतातील ग्रेस

पैलपारीचे चिंतन

एक धुके सांजवेळी

जणू गडद , गहन !

 

फुलराणीच्या गंधात

सप्तरंगी श्रावणात

रिमझिमे बालकवी

रसिकांच्या अंगणात !

 

एका भटाची गझल

रक्तचंदनाची धार

रसिकांच्या काळजात

एक सुरी आरपार !

 

संत पंत आणि तंत

त्रिवेणी ये संगमास

सदा सिद्ध सारस्वत

नवनव्या प्रवाहास !

 

प्रतिभावंत शब्दांचे

गंधर्वांच्या कंठी सोने

गीत संगीतात येता

धन्य श्रुती , धन्य जीणे !

 

प्रतिभेच्या पाखरांना

मायबोलीचे हाकारे

एक एक तारा तुम्ही

एक एक नभ व्हा रे !

 

माझ्या मायमराठीची

किती वर्णू मी थोरवी

नित्य नवे वारकरी

नित्य नूतन पंढरी !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments