श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
🌳 भाग्यरेषा… 🌳 श्री सुहास सोहोनी ☆
ना पुष्प लगडले
कधीहि फांदीवर
मग यावे कैसे
मधूर फळ रुचकर
खरखरीत पाने
हिरवट मळकट दिसती
खोडावर खवले
दृष्टीसही बोचती —
वृक्षांच्या गर्दित
मीहि एकला वृक्ष
सामान्य कुळातिल
करावया दुर्लक्ष
संगोपन होण्या
कधीच नव्हतो पात्र
मोजतो जन्मभरि
दिवस आणखी रात्र —
ना मिळे भव्यता
पिंपळ वटवृक्षाची
ना सुंदरता ती
कदंब वा बकुळीची
भरगच्च दाटि ना
फांद्यांवर पर्णांची
ना पिले खेळती
अंगावर पक्षांची —
परि भाग्य लाभले
भरुन काढण्या उणे
अन् देवदयेने सुदैव
झाले दुणे
मन तृप्त होउनी
न्हाले संतोषात
मज जन्म लाभला
पवित्र देवराईत !! —
© सुहास सोहोनी
रत्नागिरी
दि. १९-०३-२०२३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈