श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
☆ कवितेचा उत्सव ☆ ते झाड…! ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆
सरत्या वेळेला कवटाळत
ऊन पाऊस झेलत
मान डोलवत आजही
जागाच आहे बुंधा…
फांद्यांना अजून
नाही लागलं डोहाळं
नेहमीची जागा सोडून
वेगळं बस्तान बसवण्याचं…
त्या अजूनही गुरफटलेल्या
तशाच एकमेकीत
पानांतल्या हरितकणांच्या
ललाट रेषा आखत…
मूळांचं आधार देणं
आजही आहे सजग
मातीतल्या सगुणत्वाला
तारकापुंज दाखवत…
पाखरांची घरटी
आजही होतात स्थिरस्थावर
वडिलोपार्जित परंपरेच्या
चंदन भूमीवर…
आजतागायत फुलांनी
बहरणं नाही सोडलं
आतड्यांचं रितेपण
फळांनी नाही सोसलं…
भूकेला घास
जगण्याला श्वास
ही जपमाळ
जपतेच आहे झाड…
म्हणूनच आता झाडांचं
करावं लागेल गॅझेट
‘माणूस’ नावाच्या
नामावलीत,
माणूसपणाचा टक्का
सहस्रांच्या रेषा लांघत
ब्रम्हांडाचा दर्प होऊन
सूर्याला उजळण्यासाठी…
© श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी
मिरज, जि. सांगली
मोबाईल : 9922048846
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈