श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ भिजलेले रक्ताश्रूंनी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(अष्टाक्षरी)
भिजलेले रक्ताश्रूंनी
जन्म मातीत गाडले
काय होते पेरलेले
काय हे रे उगवले !
दुभंगलो ज्यांच्यासाठी
जन्म ठेवला तारण
समशेरींनी त्यांच्याच
कसे काळीज विंधले !
ऐन वादळाच्या वेळी
झाले पारखे किनारे
अनायासे तूफानांशी
थोडे मैत्रही जूळले !
घर बांधून पाठीशी
दिशा धुंडाळल्या दाही
वाट शून्याचीच होती
किती पाय रक्ताळले !
झाला बेसूर झंकार
वेदनेच्या वीणेचाही
बंधातून हौतात्म्याच्या
केले दुःखास मोकळे !
मुशाफिर सर्वत्राचा
जिथे तिथे आगंतुक
नाही भूमीस भावलो
नाही आकाश लाभले!
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈