मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सेतू – कवी स्व वसंत बापट  ☆  कवितेचे रसग्रहण सौ.अमृता देशपांडे

स्व वसंत बापट

जन्म – 25 जुलाई 1922

मृत्यु – 17 सितम्बर 2002

☆ कवितेचा उत्सव ☆ सेतू ☆ कवी स्व वसंत बापट  ☆  प्रस्तुति – सौ. अमृता देशपांडे ☆ 

शरदामधली पहाट आली तरणीताठी

हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती

शिरि मोत्याचे कणिस तरारुन झुलते आहे

खांद्यावरती शुभ्र कबूतर खुलते आहे

 

नुक्ते झाले स्नान हिचे ते राजविलासी

आठ बिचा-या न्हाऊ घालित होत्या दासी

निरखित अपुली आपण कांती आरसपानी

थबकुन उठली चाहुल भलती येता कानी

 

उठली तो तिज जाणवले की विवस्त्र आपण

घे सोनेरी वस्त्र ओढुनी कर उंचावुन

हात दुमडुनि सावरता ते वक्षापाशी

उभी राहिली क्षण ओठंगुन नीलाकाशी

 

लाल ओलसर पाउल उचलुन तशी निघाली

वारा नखर करीत भवती

रुंजी घाली

निळ्या तलावाघरचे दालन उघडे आहे

अनिश्चयाने ती क्षितिजाशी उभीच आहे

 

माथ्यावरती निळी ओढणी तलम मुलायम

गालावरती फुलचुखिने व्रण केला कायम

पायाखाली येइल ते ते

खुलत आहे

आभाळाची कळी उगिच

उमलत आहे

 

झेंडू डेरेदार गळ्याशी

बिलगुन बसले

शेवंतीचे स्वप्न सुनहरी

आजच हसले

निर्गंधाचे रंग पाहुनी

गहिरे असले

गुलाब रुसले, ईर्षेने

फिरुनि मुसमुसले

 

फुलांफुलांची हनु कुरवाळित

अल्लड चाले

तृणातृणाशी ममतेने ही

अस्फुट बोले

वात्सल्य न हे! हे ही

यौवन विभ्रम सारे

सराईताला कसे कळावे

मुग्ध इशारे

 

दिसली ती अन् विस्फारित

मम झाले नेत्र

स्पर्शाने या पुलकित झाले

गात्र नि गात्र

ही शरदातिल पहाट…..

की……ती तेव्हाची  तू?

तुझिया माझ्या मध्ये

पहाटच झाली सेतु

 

कवी – स्व वसंत बापट 

(चित्र साभार लोकमत https://www.lokmat.com/maharashtra/todays-memorial-day-vasant-bapat/)

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈