श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ आधार तू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
जननायका जनलोक हे म्हणती तुला करुणाकरा
जगजीवना आधार तू व्हावे मला शशिशेखरा
आनंदल्या गोपांसवे लीला तुझ्या वृंदावनी
राधा सखी आजन्म ही आहे तुझी मुरलीधरा
बांधील तू आहेस ना विश्वास या तारावया
लक्ष्मीपते वसतोस तू शेषावरी कमलाकरा
उद्धारण्या देवादिका निळकंठ तू झालास ना
रिझवायला माथी तुझ्या गंगा वसे गंगाधरा
व्योमात तू रोमात तू प्रांणातही तू सर्वदा
असते कशी सजिवातही वस्तीतुझी धरणीधरा
जगणे असो मरणे असो लय पावते चरणी तुझ्या
पद्माकरा सृष्टीस या सांभाळ तू राजेश्वरा
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈