श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ तूच तू… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
श्वासाहून प्रिय तू,
सत्य तू अन् भास तू.
जीवन-मरण तूच तू,
तूच श्वास,ध्यास तू.
घुसमट तू, तूच वारा,
तू नभीचा स्थिर तारा.
नीरवता तू, तू कविता,
तूच दर्या जो उसळता.
तूच वृक्ष ,तूच सळसळ ,
पालवी तू ,तू पानगळ .
तूच वास्तव ,स्वप्न तू,
दृष्टी तू, दृष्टिकोन तू.
विसर्जित झालो कधीचा ,
मात्र केवळ तूच तू.
माझे-तुझे अद्वैत घडता,
मग,काय मी अन् काय तू? …
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈