सुश्री शोभना आगाशे
कवितेचा उत्सव
☆ ज्येष्ठ… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
वैशाख लाही निवू लागली
ज्येष्ठाची लगबग सुरू जाहली
जांभुळ पिकल्या झाडाखाली
निळी, जांभळी माती सजली
आम्रतरूवर जमुनि पक्षी
सोनकेशरी सांडत नक्षी
सुगंध मोगरा सांज धुंद करी
मात त्यावरी मृद् गंध परि करी
रवीतापाने दग्ध धरित्री
शांतविण्या ये वळीव रात्री
धसमुसळा हा, रीत रांगडी
औटघडीचा असे सवंगडी
तप्त तनुला शांत जरी करी
अंतरंगा तो स्पर्श नच करी
अंतर्बाह्य तृप्ती तियेची
करील हळुवार धार मृगाची
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈