कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

जन्म – 7 ऑक्टोबर 1866

मृत्यु – 7 नोव्हेंबर 1905

☆ कवितेचा उत्सव ☆ झपूर्झा ☆

कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) ☆  प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

हर्ष खेद ते मावळले,

हास्य निमाले;

अश्रु पळाले;

कण्टकशल्यें बोंथटली,

मखमालीची लव वठली;

कांही न दिसे दृष्टीला

प्रकाश गेला,

तिमिर हरपला;

काय म्हणावें या स्थितीला?-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!१!!

 

हर्षशोक हे ज्यां सगळें,

त्यां काय कळे ?

त्यां काय कळे ?

हंसतिल जरि  ते आम्हांला,

सर न धरू हे वदण्याला:-

व्यर्थी अधिकचि अर्थ वसे

तो त्यांस दिसे,

ज्यां म्हणति पिसे.

त्या अर्थाचे बोल कसे ?-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!२!!

 

ज्ञाताच्या कुंपणावरून,

धीरत्व  धरून,

उड्डाण करून,

चिद्घनचपला ही जाते,

नाचत तेथें चकचकते;

अंधुक आकृति तिस दिसती,

त्या गाताती

निगूढ गीति;

त्या गीतीचे ध्वनि निघती-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!३!!

 

नांगरल्याविण भुई बरी

असे कितितरी;

पण शेतकरी

सनदी तेथें  कोण वदा !-

हजारांतुनी एकादा !

तरी न्, तेथुनि वनमाला आणायाला,

अटक तुम्हांला;

मात्र गात हा मंत्र चला-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!४!!

 

पुरूषाशीं त्या रम्य अति

नित्य प्रकृति

क्रीडा करिती;

स्वरसंगम त्या क्रीडांचा

ओळखणें,  हा ज्ञानाचा

हेतु;  तयाची सुंदरता

व्हाया चित्ता-

प्रत ती ज्ञाता,

वाडें फोडें गा आतां-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!५!!

 

सूर्य चंद्र आणिक तारे

नाचत सारे

हे प्रेमभरें

खुडित खपुष्पें फिरति जिथें,

आहे जर जाणें तेथें,

धरा जरा नि:संगपणा

मारा फिरके,

मारा गिरके,

नाचत गुंगत म्हणा म्हणा-

झपूर्झा ! गडे झपूर्झा !  !!६!!

 

कवी – स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)   

(चित्र साभार कृष्णाजी केशव दामले – विकिपीडिया (wikipedia.org))

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)  

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments