श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “मिड-लाईफची कथा – मानवाची व्यथा…” ☆ श्री आशिष मुळे ☆
निम्म्या अंतराची कथा
ऐकुन तू घेशील का
आहे माणूसच मी
व्यथा तुला कळेल का
उधाणाच्या या दर्यात
कश्ती तुझी टिकेल का
दर्याच्या खोल मनातली
दौलत तुला दिसेल का
तापलेल्या जिंदगीची
बरखा तू बनशील का
विझत चाललेल्या सूर्याची
पहाट लाली होशील का
आजवर चाललेले अंतर
क्षणात या मिटवशिल का
अंतराच्या अंतरात्म्याची
कहाणी तू ऐकशील का
शब्दांना या माझ्या
अर्थ तू देशील का
एकसूरी बेसूर गाण्याला
चाल काही लावशील का
गुंता या निरर्थक खेळाचा
अलगद बोटांनी सोडवशील का
कधी न भरणाऱ्या या पोटाची
भूक तू संपवशील का
सोडून लाज सारी
कुशीत मला घेशील का
मनातल्या निर्लज्ज बाळाची
आई बनूं शकशिल का…
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈