श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 164 – श्रावण सरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
ठुमकत मुरडत
आल्या श्रावणाच्या सरी।
पोरीबाळी थिरकती
रिमझिम तालावरी।।
ओथंबती जलदही
कधी उन्हे डोकवली।
मोहवितो निलकंठ
नृत्यासवे केकावली।।
अवखळ नद्या नाले
ऊन्मादात खळाळती।
शीळ घाली रान वारा
गीत पाखरे ही गाती।।
नववधुपरी धरा
शालू हिरवा नेसली।
ठेवा जपुनी सौख्याचा
सृजनाचं लेणं ल्याली।।
सृजनाच्या सोहळ्यात
ओटी धरेची भरली
सप्तरंगी तोरणाने
चैतन्यात सृष्टी न्हाली।।
सुखावला कृषिवल
सणवार मांदियाळी।
अनुबंघ जपणारी
प्रथा श्रावणी आगळी।।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈