श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 200
☆ वंदन मित्रा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
तू नारायण तुझी स्मृतीतर चंदन मित्रा
गंगेहुनही तुझे भावते गुंजन मित्रा
वेडी बाभळ पायाखाली होती कायम
अन् पोटाला धावपळीने लंघन मित्रा
हात पसरले कधीच नाही दान घ्यायला
निर्धाराला तुझ्या करावे वंदन मित्रा
हसरा मुखडा घेउन फिरला तू जीवनभर
अन् मित्रांचे केले कायम रंजन मित्रा
दुःख वाटते सहवासाला मुकलो आम्ही
तू तर होता मित्रांमधला कुंदन मित्रा
तू गेला पण कारण त्याचे कळले नाही
त्या घटनेचे कायम करतो चिंतन मित्रा
तुझी पालखी ज्या वाटेने गेली आहे
त्या मातीचे घेतो आहे चुंबन मित्रा
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈