श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “पश्चात्ताप…” ☆ श्री आशिष मुळे ☆
दिली जीभ म्हणून चालवत गेलो
अजाणतेपणी भावना कापत गेलो
हेतू निराळा पण दिसत वेगळा गेलो
पश्चात बुद्धी दग्ध पश्चातापे झालो
बळावर बुद्धीच्या जिंकण्यासाठी
भावना तुमच्या विसरत गेलो
वरती जायच्या नादात
नकळत त्या चुरडत गेलो
विषयाशी एकरूप होता होता
परिस्थितीशी फारकत घेत गेलो
काळाच्या पुढे धावता धावता
वेळेचे महत्व विसरत गेलो
दुखवायचा कधीच हेतू नव्हता
इर्श्येचा लवलेश नव्हता
मात्सर्याचा तर पिंडच नव्हता
बुध्दीचा मात्र गर्व होता
तरी मूर्खपणा करत गेलो
जिंकायच्या नादात हरत गेलो
बोलत असलो सत्य तरी
बनत फाटक्या-तोंडाचा गेलो
चूक माझी मला मान्य आहे
सजा द्याल ती मंजूर आहे
बंदुकी साठी या तुमच्या
चिलखत आज उतरवले आहे
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈