सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ पाऊस : आकाशातला आणि डोळ्यातला ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
आकाशातल्या पावसाला असतो ऋतू आणि काळ
डोळ्यातला पाऊस कधी कुठेही सर्वकाळ
आकाशातल्या पावसाला येरे येरे विनवण
डोळ्यातल्या पावसाला नको नको हे सांगण
आकाशातला पाऊस सवे घेण्या सारे आतूर
डोळ्यातल्या पावसाला ठेऊ पाहती सारे दूर
आकाशीचा पाऊस हर्ष उल्हास लकेर
डोळ्यातला पाऊस दु:ख दावे काळीज विभोर
असले कितीही फरक ,साम्य पण आहे दोघात
दोघांचीही अतिवृष्टी किंवा कोरडी वृत्ती ये जीवन धोक्यात
भूवरील पाणी बाष्पीभवनाने वर जाऊन घनात दाटे
घनास या अनिलाचा कोमल स्पर्श सुखावे
मग जलौघ आर्ततेने भूवर धावे
हे पावसाचे चक्र
काळजातील वेदना नकळत नयनात दाटे
कोणाच्या तरी बोलण्याचा वारा त्याला विचारे
हाच जलौघ असहायतेने कपोली धावे
हे आसवांचे चक्र
अशीच समानता देवाने सर्वांसाठीच दिली
तुमचे विचार तुमची दृष्टी यानेच त्याची नीती बदलली
पहा थोडी दृष्टी बदलून
डोळ्यातील पाऊसही येईल आनंद घेऊन
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈