कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 187 – विजय साहित्य
☆ रक्षा सूत्र ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
श्रावणाच्या पौर्णिमेला
रक्षा बंधनाचा सण
रक्षा सूत्र अनमोल
घेई वेचूनीया मन…!
ताई तुझ्या भेटीसाठी
होते सालंकृत राखी
राग लोभ भांडणात
नाते गुंफतसे राखी…!
राखी कौटुंबीक बंध
करी राखण नात्याची
भावा बहिणीचा सण
पाठ राखण मायेची..!
एका रेशीम धाग्यात
आठवणी विसावल्या
गोड घास मुखी तुझ्या
औक्षणाने सामावल्या..!
दीपज्योती स्नेहवाती
भावा बहिणीची जोडी
आठवांच्या चांदण्यात
आहे अमृताची गोडी…!
अमरत्व निर्भयता
राखी देते संजीवन
येता श्रवण नक्षत्र
करू नात्यांचे रक्षण..!
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈