कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 197 – विजय साहित्य
☆ एकादशी महात्म्य…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
कार्तिकी एकादशी
शैव वैष्णवांची भेट
हरीहर थेट
एकत्रित .. . . ! १
मातला असूर
दिले सांबाने अभय
मृत्युचेच भय
अव्हेरीले . . ! २
मृदुमान्य दैत्य
ग्रासे देवांना अपार
अत्याचारी वार
पदोपदी. . . . ! ३
देवादिक सारे
घेती गुहेचा निवास
घडे उपवास
देवांप्रती. . . . ! ४
हरी श्वासातून
जन्मा आली शक्ती
तीच रूपवती
एकादशी. . . . ! ५
मृदुमान्य वध
होई पर्जन्य वर्षाव
असा आनंदोत्सव
प्रबोधिनी. . . . ! ६
सरे योगनिद्रा
पुन्हा सृष्टीचे पालन
पापांचे क्षालन
हरीहर. . . . ! ७
बेल विष्णूसाठी
आणि शंकरा तुळस
अध्यात्म कळस
अंतरात . . . ! ८
प्रबोधिनी एकादशी
शैव वैष्णवांची दाटी
धनारोग्य पाठी
यशोकिर्ती. . . ! ९
कार्तिकाची एकादशी
संपे आज चातुर्मास
सौख्यदायी सहवास
प्रासादिक…! १०
कन्यादान पुण्यप्राप्ती
पर्व तुलसी विवाहाचे
मोक्षदायी प्रवासाचे
पंचदिन…! ११
एकादशी व्रत
देई सुख समाधान
कैवल्य निधान
हरीहर…! १२
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈