सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ कवितेचा उत्सव ☆ गतसालातुन नववर्षाकडे …. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
काय लिहावे तुझ्या वरती,
हे मावळत्या गत साला!
शतकानंतर संकटाचा,
कसा घातलास तू घाला!
स्वागत तुझे केले तेव्हा,
आम्ही जरी नव उत्साहाने!
बीज पेरले जगी त्या क्षणी,
ह्या कोरोनाच्या व्याधीने !
जाणीव झाली कोरोनाची,
येई तो मुंगीच्या पावली !
जगभर पसरत गेली ,
हळूहळू मृत्यूची सावली!
कसा जिवाणू, कुठे प्रकटतो,
त्या होते जग अज्ञानी !
मास्क, सॅनिटायझर आधार ,
होती सार्या समाज जीवनी!
कसे वर्ष हे गेले अमुचे,
भीतीच्या छायेखाली!
नव साल हे येईल आता,
जगी सुखद पाऊली !
आशेवरती जगतो माणूस,
विश्वास दाखवत स्वतः वरी!
व्हॅक्सीन शोधून मात करील
तो आल्या संकटावरी !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈