श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 219
☆ जोखड आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
जीवन सोपे झालेले पण जगणे अवघड आहे
गायीचा मुडदा पडतो ती होता भाकड आहे
☆
पैशाच्या मोहापायी मज भवती जमले सारे
पण श्वास थांबला नाही दाखवली रोकड आहे
☆
सण आनंदाचा होता उत्साही होते सारे
मी ईद मुबारक म्हणता घाबरला बोकड आहे
☆
खाणीत कोळशाच्या मी अन् तो आहे सोन्याच्या
मी गुहेत अंधाराच्या का खेळत धुलवड आहे
☆
जीवनदाते जेथे त्या जागेला किंमत येते
श्रावण बाळाच्या हाती सोन्याची कावड आहे
☆
झाडावर जागा होती पिल्लाला रुचली नाही
त्या जुनाट घरट्याचीही झालेली पडझड आहे
☆
शेतात राबतो आहे डोईवर कपास त्याच्या
बैलाच्या खांद्यावरती अजूनही जोखड आहे
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈