कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 204 – विजय साहित्य
☆ नदी काठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
नदी काठी विसावल्या
दोन संसारिक पिढ्या
उगवती मावळती
भाव भावनांच्या उड्या…! १
☆
नातवंडे खेळताना
येई नदीला बाळसे
गुजगोष्ठी मनातल्या
हसे वार्धक्य छानसे…! २
☆
देई बोलका दिलासा
आधाराची काठी हाती
टाळी वाजता पाण्यात
उजळली पहा नाती…!३
☆
उगवती मावळती
नदी काठी संगमात
बाल,तारूण्य वार्धक्य
आठवांच्या आरश्यात…!४
☆
उगवती दावी जोर
बालपण झाले जागे
सांजावली दोन मने
अनुभव राही मागे…!५
☆
नदी धावते धावते
पोटी घेऊन जीवन
काठावरी फुलारले
सानथोर तनमन…!६
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈