श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
आजवर उच्यपदस्थ म्हणून मिरवणाऱ्या भामट्यांनो आता तुम्ही खरेच जागे व्हा
बांडगुळांसारखे अधांतरी जगणं सोडून
जरा झाडाबुडीच्या संस्कारक्षम मातीवर या
म्हणजे कळेल तुम्हाला जगवणाऱ्या मुळांची कशी असते दशा आणि कोणती असते दिशा
आम्ही मूळं होऊन जगवलाय डवरलेला समाज वृक्ष
प्रसन्नतेने डुलणारा डवरणारा निसर्ग नियमांचे पालन करून
मूळं, खोड, फांद्या, फुलं, फळं हे अवयवच आमचे
एकजिन्सी होऊन मातीच्या मांडीवर हसत खेळत ताठ मानेने उभे आहोत
आणि तुम्ही ऐतखाऊ होऊन अधिपत्य गाजवायला कसे काय आलात रे तिथं अचानक
आजवर तुम्ही ज्ञानाचे पोशिंदे म्हणूनच वावरलात
केलात घात आमचा
आम्हाला मातीत गाडून
पण आम्ही कुजणारे नाही वाढणारे आहोत
हे कसं काय विसरलात ?
रोज उगवणारा नवा सूर्य देतोय नवी ऊर्जा आम्हाला
त्यानं आपली पिलावळ पेरली आहे आमच्या मातीत
तीच तर आता तरारून वाढते आहे
नवे क्षितीज कवेत घेऊन
त्यांनी केलाय ज्ञानाचा मुलुख पादाक्रांत
मुळांचा उद्धार करण्यासाठी
आता होतील मूळं मजबूत
वाढेल समाजवृक्ष पुन्हा
बळकट होऊन
पिलावळीतील ग्रह गोल तारे सुद्धा करतील तुमचा खात्मा
सगळ्याच प्रकारची झाडं
निकोप होऊन वाढावीत म्हणून
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈